वाशिम:महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलितबहुल गावात १०० टक्के विद्युतीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत राज्यभरातील १९२ गावांत हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील १५ गावांचा समावेश असून या गावांमध्ये वीज जोडणी देण्याची प्रकिया सुरु झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उदिष्ट्य असून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात पोहोचवण्याचे उदिष्ट्य असून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. १४ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान संपूर्ण राज्यात ‘ग्रामस्वराज्य’ अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील ज्या गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असून यात वाशिम जिल्ह्यातील १५ गावांमध्ये जवळपास ४०० नवीन विद्युत जोडण्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबीर लावण्यात येणार असून या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. ज्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आलेला आहे अशा ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरली तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गावांमध्येही या अभियाना अंतर्गत सौभाग्य योजनेतील तरतुदींप्रमाणे १०० टक्के वीज जोडणी दिल्या जाणार आहे. जिल्ह्यातील मालेगाव उपविभागातील हनवतखेड, दाव्ही आणि जोडगव्हाण मंगरूळपीर उपविभागातील जांब, मूर्तिर्जापूर आणि सनगाव तर कारंजा उपविभागातील इंझा आणि सोहाळ वाशिम उपविभागातील तांदळी (बु),पंखाळा,राजगाव आणि सावळी रिसोड उपविभागातील वनोजा आणि लिंगा कोतवाल या गावांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी या सर्व १५ गावात मोठया संख्येत शिबीर लावण्यात येणार आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभागी होऊन सौभाग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहेत.