वाशिम : वाशिम सायकलस्वार ग्रुपने वाशिम ते पातूर असे ये-जा करीत १०० किलोमिटरचे अंतर कापले आहे. दर रविवारी अशी सायकलस्वारी करीत १०० व्या रविवारी अर्थात २३ एप्रिल रोजी या सायकलस्वार ग्रूपने खड्डे बुजविण्याचा उपक्रम राबविला.वाशिम येथील ३0 युवक व ३ महिला अशा ह्या वाशीम सायकलस्वार ग्रुपने आतापर्यत वाशीम ते लालबाग व वाशिम ते कन्याकुमारी असे अंतर कापले आहे. तसेच फ्रान्स येथील ब्रेवेट स्पर्धेत देखील वाशीमचे नाव चमकवले आहे. यापुढील सायकलस्वार ग्रुपची पुढील मोहीम वाशिम ते काश्मीर ही आहे. ही मोहीम १५ मे रोजी वाशिम येथून सुरु होईल. या सायकलस्वार ग्रुपची सुरुवात श्रीनिवास व्यास, अरविंद उलेमाले व मनिष मंत्री या युवकांनी केली असून या मोहिमेव्दारे हे युवक समाजाला निरोगी व नेहमी व्यायाम करण्याचा संदेश देत आहेत. सायकलस्वार ग्रुपच्या माध्यमातुन ग्रुपमधील नारायण व्यास व महेश धोंगडे यांनी या मोहीमेला सामाजिक कार्याची जोड देवून वाशिम ते मालेगाव रोडवरील खड्डे बुजवून आपला १०० वा रविवार साजरा केला.