लोकमत न्यूज नेटवर्कजऊळका रेल्वे : जऊळका रेल्वे येथील दर गुरुवारी भरत असलेल्या बाजारात एका अनोळखी इसमाने १०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन पाणीपुरी व भाजीवाल्याची फसवणूक केल्याची घटना जऊळका रेल्वे येथे १ जूनला घडली. याप्रकरणी जऊळक रेल्वे पोलिसांंनी २ जून रोजी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला.जऊळका रेल्वे येथे १ जून रोजी भरलेल्या बाजारामध्ये एका अनोळखी इसमाने १०० रुपयांच्या झेरॉक्स नोटा देऊन चिल्लर विके्रत्यांची फसवणूक केली. या घटनेची तक्रार जऊळका रेल्वे येथील पाणी-पुरी विक्रेता कैलास भोसले यांनी दिली. पाणीपुरीच्या हातगाडीजवळ सायंकाळी ७ च्या दरम्यान २० ते २५ वर्ष वयोगटातील सडपातळ युवक पाणीपुरी खाण्यासाठी आला होता. १० रुपयांची पाणीपुरी खाऊन १०० रुपयाची नोट दिली. त्याला ९० रुपये परत केले. दुसऱ्या दिवशी २ जून रोजी काही भाजी विक्रेत्यांनी सांगितले की, गुरुवारच्या बाजारामध्ये १०० रुपयाची झेरॉक्स नोट आली होती. तिचा क्रमांक ५ एएफ २२३५६७ क्रमांक असा होता. इतरही विक्रेत्यांकडे या नोटा आढळल्या. या सर्व नोटांचा क्रमांक एकसारखा असून, सर्व व्रिकेत्यांजवळ १३ नोटा आढळून आल्या. आणखी काही नोटा बाहेरच्या व्रिकेत्याजवळही गेल्याची माहिती आहे. भाजीपाला विक्रेते रामकृष्ण गाभणे, महादेव शिंदे, बाळु दवळे, अनंदा गाजरे, शेख झाकीर रा.जऊळका यांच्यासोबत चर्चा केल्या असता, त्यांच्याजवळही नोटा आल्या होत्या. या झेरॉक्स नोटाद्वारे फसवणूक केल्याची तक्रार विक्रेत्यांनी केली. या तक्रारीवरून जऊळका पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध कलम ४९८ ब, भादंविनुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आरसेवाट, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बन्सोड, बिट जमादार विलास ताजणे करीत आहेत. बनावट नोटा आढळल्याने येथील बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे.
शंभर रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणी गुन्हा!
By admin | Published: June 03, 2017 1:58 AM