वाशिम : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, एप्रिल महिन्यात गत सात दिवसांत वाशिम तालुक्यात तब्बल १००३ रुग्ण आढळून आले. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंताही वाढली आहे.
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम शहरात जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. ऑगस्ट ते सप्टेंबर २०२० या दरम्यान वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढली होती. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूही पाळला. याला वाशिमकरांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खालावला. जानेवारी महिन्यापर्यंत हा आलेख खालावलेला होता. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोना बाधितांच्या संख्येत चढ-उतार येत होते. त्यानंतर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एप्रिल महिन्यात यामध्ये आणखी वाढ झाली. वाशिम शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे. ग्रामीण भागातही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. गत सात दिवसात वाशिम तालुक्यात १००३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संदिग्ध रुग्णांची तपासणी आणि कोरोना चाचणी केली जात आहे. नागरिकांनीदेखील सतर्क राहावे, असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
०००
लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करावी !
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे आदी लक्षणे दिसताच तातडीने कोरोना चाचणी करावी. वेळीच निदान झाले तर उपचार करणे सोयीचे होते. वेळीच उपचार मिळाल्याने संबंधित रुग्ण हे कोरोनातून लवकर बरे होत असल्याने नागरिकांनी कोणताही आजार लपवू नये, लक्षणे दिसताच चाचणी करावी, असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००००
००
असे आढळले रुग्ण
१० एप्रिल १५३
११ एप्रिल १८०
१२ एप्रिल २०१
१३ एप्रिल ९५
१४ एप्रिल १७२
१५ एप्रिल १३७
१६ एप्रिल ६५
एकूण १००३