वाशिम : बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागातील १०११८ विद्यार्थी इंग्रजी भाषा विषयात अनुत्तीर्ण झाले असून, ३६९७ जणांची मराठी मातृभाषाही कच्ची असल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून समोर आले.
बारावीच्या परीक्षेत इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, संस्कृती, पाली या भाषेसह इतिहास, राज्यशास्त्र, गणित, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र यांसह एकूण १२३ विषयांपैकी पसंतीनुसार विद्यार्थ्यांना विषय निवडता येतात. अमरावती विभागात बारावीच्या परीक्षेत एकूण १ लाख ४७ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा पेपर सोडविला होता. त्यापैकी १ लाख ३७ हजार ३५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी ९३.१४ अशी येते. इंग्रजी विषयात १० हजार ११८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. एकूण १ लाख १५ हजार ४३० विद्यार्थ्यांनी मराठी पेपर दिला होता. त्यापैकी १ लाख ११ हजार ७३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी ९६.८० अशी येते. ३६९७ विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण झाले. एकूण ४७ हजार ७२० विद्यार्थ्यांनी इतिहासाचा पेपर सोडविला असून, यापैकी ४५ हजार १०९ विद्यार्थी उत्तीर्ण तर २६११ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
राज्यशास्त्रात २६५४ विद्यार्थी अनुत्तीर्ण !
अमरावती विभागात बारावीत ४९ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र विषयाचा पेपर दिला होता. यापैकी ४६ हजार ६८७ विद्यार्थी उत्तीर्ण तर २६५४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
६६१५२ जणांचा गणिताचा पाया मजबूत !
अमरावती विभागात ६६ हजार ८९६ विद्यार्थ्यांपैकी ६६ हजार १५२ विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी ९८.८९ येते. केवळ ७४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
आकडे बोलतात...
विषय / उत्तीर्ण / अनुत्तीर्ण
इंग्रजी / १३७३५६ / १०११८
मराठी / १११७३३ / ३६९७हिंदी / ३९४५ / १०५
गणित / ६६१५२ / ७४४भौतिकशास्त्र / ७७८९९ / ४३२
जीवशास्त्र / ७१३६० / ३९८रसायनशास्त्र / ७७९०४ / ३९५
अर्थशास्त्र / ५२००३ / ३३२५