वाशिम : विविध योजनेच्या ऑनलाईन कामाची सक्ती, अल्प मानधन, दिवाळीला बोनस देणे, मोबदल्यात वाढ करणे यांसह अन्य मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या (आयटक) नेतृत्वाखाली बुधवार, १८ आक्टोंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले. सायंकाळी उशिरापर्यंतही या आंदोलनावर तोडगा निघाला नाही.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सन २००९ पासुन आरोग्य विभागात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. जिल्ह्यात १०४५ आशा स्वयंसेविका तर ४६ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वयं सेविकांची नेमणूक कामावर आधारित मोबदला या तत्वावर तर गटप्रवर्तकांची नेमणूक आशासेविकाच्या कार्यक्षेत्रात दौरे करून आशांच्या कामकाजाचे संनियंत्रण व मुल्यांकन करण्यासाठी केली. प्रत्यक्षात आशा सेविकांना नेमुन दिलेल्या कामाचा अत्यल्प मोबदला देण्यात येतो तर काही कामे हि विनामोबदला सुध्दा करुन घेतली जातात.
आशा सेविकांना संगणक कामाचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही, इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञांन नाही, सोबतच बहुतांश आशाकडे अँड्राईड मोबाईल उपलब्ध नसतांना अलीकडे आशा सेविकांना आभा, हेल्थ कार्ड, गोल्डन कार्ड, प्रधानमंत्री मात्रृ सुरक्षा योजनेच्या ऑनलाईन कामाची सक्ती केली जात आहे. त्यामुळे आशांना कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईनची कामे देण्यात येऊ नये, मोबदल्यात वाढ करावी यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारपासून आयटक संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले. पहिल्याच दिवशी १०० टक्के सहभाग लाभल्याने कामकाज प्रभावित झाल्याचे दिसून आले. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंतही या आंदोलनावर तोडगा निघाला नाही.