संतोष वानखडे
वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित असून, जिल्ह्यातील १९,७१५ विद्यार्थ्यांना ८१.८१ लाख रुपये परीक्षा शुल्क परत कधी मिळणार, याची प्रतीक्षा लागून आहे.
कोरोनामुळे गत दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षादेखील रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा एकूण ३६३ आहेत. यामध्ये एकूण १९,७१५ विद्यार्थी आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यातील सरसकट १९,७१५ विद्यार्थी पास झाले आहेत. दहावी परीक्षेचे शुल्क ४१५ रुपये असून, १९७१५ विद्यार्थ्यांनी एकूण ८१ लाख ८१ हजार ७२५ रुपये परीक्षा शुल्क भरले आहे. परीक्षाच रद्द झाल्याने शुल्क परत मिळणे अपेक्षित असून, शुल्क परत केव्हा मिळणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.
------------------------------------अशी आहे जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थिसंख्या
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा -३६३
दहावीतील एकूण विद्यार्थी : १९,७१५
प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४१५
एकूण परीक्षा शुल्काची रक्कम -८१.८१ लाख
--------------------------------------कोट
शासनाच्या निर्णयानुसार दहावीची वार्षिक परीक्षा रद्द झाली आहे. जिल्ह्यात १९ हजार ७१५ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- रमेश तांगडे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम
...................
कोट
कोरोनामुळे दहावीच्या शाळा जवळपास १ महिनाभर सुरू होत्या. त्यानंतर शाळाही बंद होत्या. ऑनलाइन पद्धतीने शिकवणी झाली. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने शुल्क परत मिळेल की नाही याबाबत संभ्रम आहे. शुल्क परत मिळणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे.
- संतोषी चव्हाण, विद्यार्थिनी
-------------------------------कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे परीक्षा शुल्क परत मिळणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे. आतापर्यंत परीक्षा शुल्क परत मिळायला हवे होते.
- दीपक शर्मा
विद्यार्थी
-------------------