प्राप्त माहितीनुसार, म्हसणी येथील पशुपालकांच्या गायींना चारण्याकरिता गुराखी रानात गेला. यादरम्यान गायींनी शेतातील ज्वारीचे कोमटे सेवन केले. त्यामुळे गायींना विषबाधा झाली. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह जि.प. सदस्य वीणादेवी अजय जयस्वाल यांना अवगत करण्यात आले. अजय जयस्वाल यांनी तातडीने इंझोरीचे पशुवैद्यकीय अधिकारी किरण जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही अधिक विलंब न करता घटनास्थळी धाव घेऊन गायींवर उपचार सुरू केले. मात्र, तोपर्यंत ११ गायी मृत्युमुखी पडल्या होत्या; तर आठ गायींना वाचविण्यात यश मिळाले. नुकसानग्रस्त पशुपालकांमध्ये मायाबाई जांभूळकर, सचिन मुराडे, संतोष चव्हाण, तुळशीराम रोकडे, संतोष वरघट, हर्षल राऊत, श्रीकांत पांडे, संतोष ठाकरे, रामकृष्ण धामोरे, संभा टिके यांचा समावेश आहे. दरम्यान, मृत्यू झालेल्या गायींवर जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खोदून अंत्यसंस्कार करण्यात आले. याकामी अजय जयस्वाल यांनी पुढाकार घेतला.
ज्वारीचे कोमटे सेवनाने ११ गायींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:29 AM