लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण विकासाला चालना देणाºया ११ कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने रोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणावी तसेच ११ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी सरपंच संघटनेने लावून धरली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकºयांचे उत्पन्न वाढावे आणि गाव समृद्ध व्हावे यासाठी शासनातर्फे ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध अकरा कामे मोहिम स्वरुपात घेऊन राबविणे आवश्यक आहे. वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची ११ कामे प्राधान्याने राबविण्याच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत. या ११ कलमी कार्यक्रमांत सिंचन विहिरी, शेततळे, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टींग, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे, ग्रामभवन, गावांतर्गत रस्ते, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, समृद्ध गाव तलाव व इतर जलसंधारणाची कामे, वृक्ष लागवड व संगोपन आणि ग्राम सबलीकरणाच्या समृद्ध ग्राम योजनांचा समावेश आहे. ग्रामीण विकासाला मोठा हातभार लावणाºया महत्वाकांक्षी अशा ११ कलमी कार्यक्रमाची अमंलबजावणी करावी, अशी मागणी सरपंच संघटनेने वारंवार केली आहे. विविध टप्प्यात आंदोलनदेखील करण्यात आले. मात्र, अद्याप या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली नाही, असे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.खरिप हंगाम आटोपल्याने आणि रब्बी हंगामात फारसा रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांना कामे मिळेनासी झाली आहेत. त्यामुळे मजुरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी तसेच विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच संघटनेचे दीपक खडसे यांनी दिला.
वाशिम जिल्ह्यात ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी ठप्प !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 5:23 PM