रिसोड : पशुखाद्याच्या वाहतुकीच्या नावाखाली आंध्रप्रदेशमधून महाराष्ट्रात येत असलेला ३ कोटी ४५ लक्ष रुपये किमतीचा ११ क्विंटल ५० किलो गांजा विदर्भ व मराठवाडयाच्या सिमेवर रिसोड पोलीसांनी १८ आक्टोबर रोजी सेनगाव-रिसोड मार्गावरून जप्त केला. गुन्हेगारीच्या विश्वातील गांजा जप्तीची विभागातील पहीलीच ऐवढी मोठी कारवाई रिसोड पोलीसांनी केल्याचे बोलले जात आहे.
रिसोडचे ठाणेदार सारंग नवलकार व त्यांच्या चमूला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी रिसोड ते मराठवाड्याच्या सीमेवर रविवारच्या रात्रीपासुन नाकाबंदी करून सेनगाव - रिसोड मार्गावरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसुन चौकशी व तपासणी केली. दरम्यान सोमवारला १८ ऑक्टोंबर रोजी आंधप्रदेश मधुन येत असलेला एम.एच.२८बी.बी. ०८६७ क्रंमाकाचा टाटा आयशर पकडण्यात आला. कारवाई दरम्यान वाहन चालकाची चौकशी केली असता प्रारंभी वाहनचालकांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत वाहनांमध्ये पशुखाद्याची वाहतूक करीत असल्याचे सांगितले. परंतु पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार वाहनाचे वर्णन तसेच वाहनात असलेल्या पशुखाद्य मालाची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी या वाहनातील पशुखाद्याचे संपूर्ण पोते बाहेर काढले. यावेळी वाहनातील पशुखाद्याच्या खाली वाहनाच्या मागच्या दिशेने गांजा असलेले भरपुर पोते आढळून आले. गांजा असलेल्या पोत्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर मोजमाप केले असता ११ क्विंटल ५० किलो गांजा आढळून आला. सापडलेल्या मालाची अमली पदार्थाच्या विश्वात असलेली किमत (३० हजार रुपये प्रति किलो) सामान्य नागरिकांचे डोळे चक्रावुन टाकणारी आहे. त्यानुसार जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ३ कोटी ४५ लाक्ष रुपये आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारंग नवलकार,पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार,शिल्पा सुरगडे, सुशिल इंगळे, गुरुदेव वानखडे, अनिल कातडे, भागवत कष्टे, संजय रंजवे, रमेश मोरे,साहेबराव मोकाळे, महावीर सोनुने, ज्ञानदेव पारवे आदींनी केली.