लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला असतानाही, दुष्काळी सवलतींची अंमलबजावणी पूर्णपणे सुरू झालेली नाही. दहावी व बारावीतील जवळपास ११ हजार विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क तातडीने परत करण्याची कार्यवाही करावी यासंदर्भात यासंदर्भात भाजपाच्या पदाधिकाºयांनी७ डिसेंबर रोजी रिसोडच्या गटशिक्षणाधिकाºयांशी चर्चा केली. रिसोड तालुक्यात दुष्काळ जाहिर होण्यापूर्वीच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणे आवश्यक आहे. रिसोड तालुक्यात उच्च माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळा मिळून जवळपास ५७ शाळा आहेत. या शाळांमध्ये साधारणत: ५७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी जवळपास ११ हजार विद्यार्थी दहावी व बारावीचे आहेत. या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे शुल्क भरलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ११ हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत मिळावे, यासंदर्भात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह मान्यवरांनी ७ डिसेंबर रोजी रिसोडचे गटशिक्षणाधिकारी पंजाबराव खराटे यांच्याशी चर्चा केली. भरलेले परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी वरिष्ठांकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. परीक्षा शुल्क माफीचे तसेच परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविले जातील, अशी ग्वाही खराटे यांनी दिली. यावेळी विष्णूपंत खाडे, अशोकराव सानप, साहेबराव इप्पर, भारत नागरे, किशोर गोमासे, किसनराव माळेकर, उद्धवराव खरबळ, सुनील बेलोकर आदींची उपस्थिती होती.
११ हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतीची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 5:59 PM