जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत १,१२० शाळांत अन्न शिजविण्यासाठी सरपणाचा वापर केला जातो. त्यामुळे शाळेच्या आवारात धुराचे लोळ उडून विद्यार्थी, शिक्षकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. आता पोषण आहार शिजविण्यासाठी संबंधित शाळांना गॅस कनेक्शन दिले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही योजना राबविण्यात आल्यास जिल्ह्यातील १,१२० शाळांना गॅस कनेक्शन मिळून या शाळांची धुरातून सुटका होणार आहे. या शाळांतील पहिली ते आठवीचे मिळून १ लाख २५ हजार १८३ विद्यार्थी व हजारो शिक्षकांचीही धुराच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. दरम्यान, या संदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाकडून माहिती घेतली असता शासनाकडून अशी कोणती योजना राबविण्यात येत असल्याची कल्पना नसून, तसे अधिकृत पत्रही त्यांना मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.
--------
अंमलबजावणी झाल्यास फायदा
कोट: पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यातील १,१२० शाळांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. हे अन्नधान्य शिजविण्यासाठी सद्यस्थितीत एकाही शाळेत गॅस सिलिंडरची व्यवस्था नाही. त्यामुळे सिलिंडर मिळल्यास शाळांना आधार होईल.
-विखे
पोषण आहार अधीक्षक जि.प. वाशिम
-------------
जिल्ह्यातील एकूण शाळा -१,१२०
गॅस कनेक्शन नसलेल्या शाळा - १,१२०
गॅस नसलेल्या तालुकानिहाय शाळांची संख्या
तालुका - शाळा
कारंजा -२१३
मालेगाव -१६६
मं. पीर -१६८
मानोरा -१७९
रिसोड -१७४
वाशिम -२२०