सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी भरले अर्ज
वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होऊ घातली असून अंतिम मुदतीपर्यंत १४ गटांसाठी ११७, तर २७ गणांसाठी १९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडी होईल की नाही? याबाबत साशंकता वर्तविली जात आहे.
जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून, पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे. २९ जून ते ५ जुलै यादरम्यान उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, शेवटच्या दिवशी अर्थात सोमवार, ५ जुलै रोजी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी ११७, तर पंचायत समितीच्या २७ गणांसाठी १९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सर्वाधिक उमेदवारी अर्ज उकळीपेन गटातून दाखल झाले आहेत. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. महाविकास आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने इच्छुक उमेदवारही संभ्रमात असल्याचे दिसून येते.
००००
असे आहेत जि. प. गटनिहाय अर्ज...
जि. प. गट अर्ज
कवठा४
गोभणी ५
भर जहाॅगीर ९
काटा ६
पार्डी टकमोर १०
उकळी पेन २२
पांगरी नवघरे १३
दाभा ६
कंझरा १०
आसेगाव ६
भामदेवी ७
कुपटा ९
तळप बु. ५
फुलउमरी ५
००००००००००००
तालुकानिहाय गट व गणांसाठी आलेले उमेदवारी अर्ज...
तालुका गटासाठी अर्जगणासाठी अर्ज
वाशिम ३८ ४९
रिसोड १८ ३२
मानोरा १९ ३३
कारंजा७ २५
मालेगाव १३ ३५
मं.पीर २२ २०
००००००००००००००००००००००००००००००
आज उमेदवारी अर्जांची छाननी
६ जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. छाननीअंती वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अवैध अर्ज ठरविल्याप्रकरणी ९ जुलैपर्यंत अपील करता येणार आहे. अपिलावर १२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १२ जुलै रोजी आहे.
०००००००००००००००००
न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष !
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर ६ जुलै रोजी सुनावणी होणार? आहे. पोटनिवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय लागणार, निवडणूक लांबणीवर पडणार की जाहीर कार्यक्रमानुसार नियोजित वेळेतच होणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
००००००००००