वाशिम : आकांक्षित तालुक्यात संकल्प सप्ताह राबविला जात असून, याअंतर्गत मालेगाव तालुक्यात ३ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत ११८७ गर्भवती महिलांची ओटीभरण करीत संतुलित आहाराचे धडे देण्यात आले.
देशातील ३२९ जिल्ह्यांतील ५०० तालुक्यांचा समावेश आकांक्षित गटात केला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याचादेखील समावेश आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण संजय जोल्हे, जिल्हा मानव विकास अधिकारी राजेश सोनखासकर यांचे निर्देशानुसार ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत आकांक्षित मालेगाव तालुक्यात संकल्प सप्ताह राबविण्याचे निर्देश प्राप्त झाले. त्यानुसार मालेगाव तालुक्यातील अंगणवाडी केंद्रावर विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती सुरू करण्यात आली.
गरोदर महिलांची ओटीभरण, ६ महिने पूर्ण झालेल्या बालकांचे अन्नप्राशन, पोषक आहाराबाबत चर्चासत्र, गरोदर महिलांना संतुलित आहाराचे जेवण, प्रोटीन पावडर तयार करून वाटप करणे, परसबाग तयार करणे, लाभार्थ्यांची वजन उंची घेणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. मालेगाव तालुक्यामध्ये एकूण १७२ अंगणवाडी केंद्रामध्ये ११८७ गरोदर महिलांची ओटीभरण व संतुलित आहाराचा सोहळा घेण्यात आला तसेच ६ महिने पूर्ण झालेल्या ३४४ बालकांचा अर्धवार्षिक वाढदिवसही एकाच दिवशी साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी कैलास घुगे, बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख, विस्तार अधिकारी मदन नायक ,स्वप्नील खंडारे,पर्यवेक्षिका नंदा झळके, मिनाक्षी सुळे तसेच पिरामल फाऊंडेशनच्या सोनी यादव यांनी संकल्प सप्ताह निमित्त कार्यक्रमांना भेटी देऊन मार्गदर्शन केले.