वाशिम : स्थानिक तिरुपती सिटी येथे भारतीय जैन संघटना व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कोविड-१९ लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला तिरुपती सिटी व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ११९ जणांनी लसीकरण करून घेतले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कोविड-१९ या लसीकरणाबाबत जनजागरण मोहीम सुरू आहे. त्यामुळे तिरुपती सिटीतील रहिवासींसाठी सदर शिबिराचे आयाेजन करण्यात आले होते. या शिबिरास सकाळी १०:३० वाजता सुरुवात करण्यात आली. भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा व जिल्हाध्यक्ष नीलेश सोमाणी यांच्या मार्गदर्शन व पुढाकाराने आयोजित या मोफत लसीकरण शिबिरात सर्वप्रथम सेवा देणारे डॉ. सुजाता भगत, आरोग्य सहायक नितीन व्यवहारे, शालिनी भगत, स्वप्नील आघामकर व पंकज उमरे यांचा अशोकराव धारव, बंकटलाल मानधने, आशा पगारिया, मकरंद दिघे, बंटी सेठी यांच्या हस्ते शाल व माला देऊन सत्कार करण्यात आला. सदर शिबिरात तब्बल १४० जणांनी लस घेण्याबाबत नोंदणी केली होती. यापैकी ११९ लोकांनी लस घेऊन या उपक्रमाचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बीजेएसच्या पदाधिकाऱ्यांसह तिरुपती सिटीचे गिरीश लाहोटी, नरेश राठी, मनोज कढणे आदींचे सहकार्य लाभले.
शिबिरात ११९ जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:27 AM