वाशिम : विश्वमांगल्य सभेचा ११ वा वर्धापन दिन राजे वाकाटक येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून ज्योत्स्ना जोशी तर प्रमुख पाहुण्या म्हणून वीणा देशपांडे, रेखा रावले तसेच विश्वमांगल्य सभेच्या उपाध्यक्षा उषा देव उपस्थित होत्या.
संस्कार, सदाचार, सेवा यावर आधारित विश्वमांगल्य सभा आहे. या संघटनेचे उद्देश, कार्यपध्दती या कार्यक्रमामध्ये सांगण्यात आली. या संघटनेविषयी सांगताना ज्योत्स्ना जोशी यांनी सांगितले की, देव, देश, धर्माप्रति आस्था असणारी आई निमित्त व्हावी. कारण संस्कृती व संस्कार जतन करुन ते पुढील पिढीला जोपासण्याचे कार्य आईला करायचे आहे. आई हाच घराचा केंद्रबिंदू आहे. आजच्या कठीण परिस्थितीत संस्काराचे महत्त्व त्यांनी सांगितले.
वीणा देशपांडे यांनी विश्वमांगल्य सभेचे कार्य म्हणजे संस्कृती व संस्कार टिकवून ठेवणे आहे तसेच भारतमुक्तीचे महत्त्व व भूमीप्रति आपले कर्तव्य काय आहे, हे सांगितले. या संघटनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन काम करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया ब्रम्हेकर यांनी केले. शहरातील महिलांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला.