वाशिम : आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ठ असलेल्या वाशिम जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज मंजूर झालेले आहे. पाच एकरात उभारल्या जाणाऱ्या ‘मॉडेल डिग्री’ कॉलेजच्या बांधकामासाठी १२ कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकास शासनाची मंजूरी मिळालेली आहे. सदर बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाणार आहे.निती आयोगाने देशभरात ७० आकांक्षित (अॅस्पीरेशन) जिल्ह्यांची निवड केली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील स्थूल नोंदणी प्रमाण (विद्यार्थ्यांचीे शाळा, महाविद्यालयातील नोंदणी), मुलींची संख्या व मागासवर्गीयांच्या लोकसंख्येचे प्रमाण या निकषावर त्या जिल्ह्यात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून मानव संसाधन विकास, मंत्रालयाच्या प्रकल्प मंजूरी मंडळाच्या १२ व्या बैठकीत राज्यातील नंदूरबार व वाशिम या दोन जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज स्थापन करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील चिखली ता. मंगरूळपीर येथे पाच एकर परिसरात शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजची उभारणी होणार असून, इमारत बांधकामाच्या १२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ७ डिसेंबर रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. सदर कॉलेज हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाशी संलग्नीत राहणार असून, प्रशासकीय नियंत्रण हे शासनाचे राहणार आहे. इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने जिल्हावासियांच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत.
शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज हे चिखली ता. मंगरूळपीर येथे पाच एकर क्षेत्रात उभारले जाणार आहे. सदर जमिन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नावेही करण्यात आलेली आहे. आता इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आहे.- शैलेश हिंगे,निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम