विदर्भातील मागासलेला जिल्हा म्हणून वाशिम जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात पाहिजे तशी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्नही रखडला आहे. जिल्ह्यात हृदय आजाराशी संबंधित कोणताही मोठा प्रश्न निर्माण झाला तर अकोला, नागपूर, औरंगाबाद याशिवाय दुसरा पर्याय नाही. जिल्ह्यातच हृदयविकाराशी संबंधित आजारावर उपचार मिळावे याकरिता आमदार अमित झनक यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे कार्डियक सेंटर, कॅथलॅबसाठी निधीची मागणी केली होती. यासंदर्भात पाठपुरावाही सुरू ठेवला होता. अखेर ७ मे रोजी हा पाठपुरावा फळास आला असून, १२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे यापुढे वाशिम येथेच ॲंजिओग्राफी, अँजोप्लास्टी व अन्य शस्त्रक्रिया होण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी कोणतीही शस्त्रक्रिया करण्यासाठी शिर्डी, अहमदनगर, पुणे, मुंबई अशा मोठमोठ्या शहरात जाऊन शस्त्रक्रिया करावी लागत होती. मात्र, आता ही गैरसोय टळणार आहे.
कार्डियक सेंटर, कॅथलॅबसाठी १२ कोटींची मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:43 AM