मानोरा : कुठल्याही धर्माच्या संस्कृतीत माणसाच्या मृत्यूनंतर माणसेच त्याच्या तिरडीला खांदा देतात. ही जुनाट परंपरा मोडीत काढून १२ सख्ख्या बहिणींनी आपल्या लाडक्या पित्याच्या तिरडीला खांदा दिल्याचे आगळेवेगळे तथा प्रेरणादायी उदाहरण शेंदूरजना (अढाव) येथे समोर आले. मुलाची उणीव मुलींनी भरून काढल्याने, याप्रसंगी समाजमनही हळहळले.
ग्रामीण भागात शिक्षणाची पाळेमुळे रुजविणारे दानशूर सखाराम गणपतराव काळे हे आप्पास्वामी शिक्षण संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष होते. वृद्धापकाळाने गत काही दिवसांपासून ते आजारी होते. अशात गुरुवार, २८ जानेवारी रोजी वयाच्या ९२व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मोठ्या मायेने व आपुलकीने पालनपोषण करून तथा शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभ्या करणाऱ्या पित्याच्या अंत्यसंस्कारासाठी बाराही मुली जमल्या. यावेळी मुलगा नसण्याची उणीव जाणवू न देता, या मुलींनीच पित्याच्या तिरडीला खांदा दिला, तसेच अंत्यसंस्कारही पार पाडले. या प्रसंगामुळे उपस्थित सर्वांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.