वाशिम: राज्य शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत यंदाच्या वर्षांसाठी कृषी विभागाकडे पूर्वसंमतीसाठी अर्ज करणा-या एकूण शेतक-यांपैकी विविध औजारांसाठी १२४४९ अर्ज शिल्लक असून, या अर्जांना पूर्वसमंती मिळण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार कृषी सहसंचालकांमार्फत शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशानंतरच या अर्जांना पूर्वसंमती देण्याबाबतचा निर्णय होणार आहे. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी शेतक-यांना सहाय्यभूत ठरणारी १०० टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना यंदाच्या आर्थिक वर्षांपासून (२०१८-१९) राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे उच्च तंत्रज्ञानाधारित कृषीयंत्रांचे हब तयार होण्याबरोबरच शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांसह अनुसूचित जाती-जमाती आणि महिला शेतकºयांना ट्रॅक्टरसाठी ३५ टक्के तर इतर बाबींसाठी ५० टक्के अनुदान, तसेच इतर लाभार्थी शेतकºयांना ट्रॅक्टरसाठी २५ टक्के तर इतर बाबींसाठी ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी यावर्षी ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासह पुढील प्रत्येक वर्षासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. दरम्यान, या पूर्वी केंद्र पुरस्कृत योजनेसाठी अर्ज केलेल्या मात्र, निधीअभावी या योजनेमधून औजारे-यंत्रे मंजूर करणे शक्य न झालेल्या शेतक-यांना राज्य योजनेमधून उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत पूर्व संमती देऊन लाभ देण्यात येणार आहे. तसेच कृषी औजारे बँके अंतर्गत अनुदानाचा लाभ देण्यासाठी शेतकरी उत्पादन संस्था, शेतकरी गट यांना प्राधान्य देण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात यंदाच्या वर्षांसाठी प्राप्त अर्जांतून कृषी विभागाने पूर्वीच शेतकºयांना मंजूरी दिली असली तरी, अद्याप कृषी विभागाकडे अनु. जाती., अनु. जमाती आणि सर्व साधारण प्रवर्ग मिळून १२४४९ अर्ज शिल्लक आहेत. त्यात केवळ ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी केलेल्या ५९०० अर्जांचा समावेश आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्याच्या कृषी विभागाने या संदर्भातील अहवाल तयार करून कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविला आहे.
कृषीयांत्रिकीकरणात १२ हजारांवर अर्जांना पूर्व संमतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 3:01 PM