नंदकिशाेर नारे, वाशिम : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच परवानाधारक व्यक्तींकडील शस्त्र जमा करण्याची कार्यवाही केली जात असून, कारंजा तालुक्यात आतापर्यंत १२ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत.
परवानाधारक व्यक्तींकडील शस्त्र जमा करण्याचे निर्देश गृहमंत्रालयाकडून देण्यात आल्याने जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांचा प्रमुख समावेश असलेल्या समितीने ठाणेदारांना शस्त्र जमा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कारंजा तालुक्यात परवानाधारक १२ व्यक्तींकडून शस्त्रे जमा करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. कारंजा तालुक्यात २८ जणांकडे शस्त्र परवाने असून त्यातील ७ जण मृत आहेत. १ जण कर्तव्यावर आहे तर १ जण सेंट्रल बँकेत सिक्युरिटी गार्ड पदावर कार्यरत आहे. त्यामुळे कारंजा शहर पोलिस स्टेशन अंतर्गतच्या १४ पैकी ५, कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत ४ आणि धनज पोलिस स्टेशन अंतर्गत ३ व्यक्तींकडून शस्त्रे जमा करण्यात आली. दरम्यान बँका आणि वित्तीय संस्थांमधील सुरक्षा रक्षकांनाही शस्त्र बाळगण्याचा परवाना असतो. परंतु त्यांना आचारसंहिता काळात शस्त्र जमा करण्याची गरज नसते. त्यामुळे दोघांकडून शस्त्रे जमा करण्यात आली नाहीत.