गतवर्षापर्यंत राज्यात शिधापत्रिकांचे नूतनीकरण, विभक्तीकरणाची शेकडो प्रकरणे प्रलंबित होती. हा विषय शासनाने गांभीर्याने घेऊन संबंधित यंत्रणेने तत्काळ प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले होते. शिधापत्रिकांचे नूतनीकरण, विभक्तीकरण व गरजूंनी अर्ज केल्यानंतर त्यांना नव्याने शिधापत्रिका देण्यासंदर्भात झालेल्या कार्यवाहीचा पुरवठा विभागाच्या उपायुक्तांकडून प्रत्येक महिन्यात आढावा घेतला जातो. त्यावरून एकत्रित माहिती शासनाला कळविण्यात येत असते. असे असताना काही तालुक्यांकडून माहिती पाठविली जात नसल्याचे शासनाच्या लक्षात आले होते. दरम्यान, राज्यातील पात्र नागरिकांना नवीन शिधापत्रिका देणे, जीर्ण शिधापत्रिका असल्यास दुय्यम शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकांमधील नावे टाकणे किंवा वाढविणे आदींसाठी कालमर्यादा विहित करण्यात आली आहे. त्याचे पालन करून वाशिम तहसील विभागाच्या पुरवठा विभागाने गेल्या ६ महिन्यांत प्रलंबित १२०० पेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढलेली आहेत. त्यात नवीन केशरी कार्ड तयार करून देण्याचे ७६६ प्रस्ताव, नवीन शुभ्र शिधापत्रिकेचे ६०, दुय्यम केशरीचे १०९, दुय्यम पिवळीचे ६७ प्रस्ताव निकाली निघाले असून, ११० लाभार्थींची नावे शिधापत्रिकांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली; तर ७० जणांची नावे शिधापत्रिकांमधून कमी करण्यात आली. विभक्तीकरणाची ६० प्रकरणेदेखील निकाली काढण्यात आली आहेत.
...................
कोट :
वाशिम तहसील कार्यालयाकडे सद्य:स्थितीत शिधापत्रिका नूतनीकरण किंवा विभक्तीकरणाचे एकही प्रकरण प्रलंबित राहिलेले नाही. गेल्या सहा महिन्यांत १२०० पेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ज्या लाभार्थींना यासंबंधी अडचण जाणवत असेल त्यांनी प्रस्ताव दाखल करावे. तत्काळ दखल घेतली जाईल.
- निलेश राठोड
पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय, वाशिम