वाशिम :
गत तीन दिवसांतील पावसाच्या संततधारेमुळे प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली असून, जिल्ह्यातील १३८ पैकी तब्बल १२१ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यामुळे रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जुलै महिन्यात आणि आॅगस्टमध्येही पावसाचा जोर वाढला. संततधार पावसाने खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान केले तर दुसरीकडे प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ झाली. गत तीन दिवसांत जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. जलसाठ्याच्या सरासरी टक्केवारीने पंचात्तरी ओलांडली आहे. जिल्ह्यात तीन मध्यम प्रकल्प आणि १३५ लघु प्रकल्प मिळून एकूण १३८ प्रकल्प आहेत. पाणलोट क्षेत्रातही संततधार पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या जलसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली. जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्प आणि ११९ लघु प्रकल्प असे एकूण १२१ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. शहरी भागांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्पही तुडूंब असल्याने उन्हाळ्यातील पाणीटंचाईची धगही कमी होण्याचे संकेत आहेत. प्रकल्प ओव्हर फ्लो असल्याने रब्बी हंगामात सिंचन करणे शेतकऱ्यांना अधिक सुलभ होणार आहे.