वाशिम : शासनाने पटसंख्या वाढीसाठी जि. प. शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या व विज्ञान केंद्राची सोय केली; परंतु, शाळांना पुरेशी पटसंख्या मिळू शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळांचे तीन किमी अंतरावरील शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश दिले आहेत. वाशिम जिल्ह्यात अशा १२२ शाळा असल्या तरी तांत्रिक अडचणींमुळे या शाळांचे समायोजन करणे अशक्य आहे. त्यामुळे या शाळा सुरूच राहणार असल्याने या ग्रामीण भागातील पालकांना दिलासा मिळाला आहे.
शासन निर्णयानुसार प्राथमिकच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे तीन किमीच्या आत अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश शासनाकडून ३ वर्षांपूर्वी पारित करण्यात आले आहेत. दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महिना वाहतूक प्रवास भत्ताही मिळणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याची शक्यता वाढली होती. वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या ७७५ शाळा आहेत. त्यापैकी १२२ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी असल्याने या शाळा शासन निर्णयानुसार बंद होण्याची शक्यता होती; परंतु पालकांचा विरोध, पर्यायासाठी ३ किलोमीटर अंतरात दुसरी शाळा नसतानाच विद्यार्थ्यांच्या प्रवासासह इतर तांत्रिक अडचणींमुळे या शाळा बंद करण्याची किंवा त्यांचे इतर शाळांत समायोजन करण्याची कार्यवाही शिक्षण विभागाकडून झालेली नाही.
---------
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन
नियमानुसार पटसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यातील १२२ शाळा बंद करण्यात आल्या नसल्या आणि त्यांचे समायोजन होणार नसले तरी या शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, अतिरिक्त शिक्षकांचे मात्र इतर शाळांत समायोजन करण्यात आले आहे.
------------
विद्यार्थ्यांच्या पालकांना तूर्तास दिलासा
शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद कराव्या लागणार आहेत. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार किमान ४०० ते ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आता तयार होणार आहेत; परंतु जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या १२२ शाळा अद्याप सुरू असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.
------
कोट :
शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार जि. प. शाळांची संख्या ४०० ते ५०० पर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जाणार आहेत. जिल्ह्यात या प्रक्रियेला दोन वर्षांचा कालावधी लागेल. सद्य:स्थितीत मात्र कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची कोणतीही तयारी नाही.
-अंबादास मानकर,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि. प. वाशिम