वाशिम - शेतातील तण कापत असताना अल्पभूधारक शेतकऱ्याला विषारी साप चावल्यानंतर त्यांच्या १३ वर्षीय मुलाने सतर्कता दाखवल्याने त्यांचे प्राण वाचले. कारंजा तालुक्यातील मोखड पिंपरी येथे बुधवारी ही घटना घडली.
मोखड पिंपरी येथील अल्पभूधारक शेतकरी शेख इमरान हे बुधवारी सकाळी आपला मुलगा शेख साहिलसोबत शेतात गेले. शेतात तण कापत असताना त्यांच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला हा प्रकार जवळजवळ असलेल्या तेरा वर्षीय शेख साहिलच्या नजरेस पडला. त्याने तात्काळ त्यांच्या हातावर सापाने चावा घेतलेल्या ठिकाणी विळ्याने चिरा मारल्या व रक्त बाहेर काढले. त्यानंतर सापाला काठीने मारत थैलीत टाकले आणि रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीकडून मोबाईल फोन घेत नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला.
शेख इमरान बेशुद्ध झाले होते. त्यानंतरही साहिल धीर न सोडता तेथेच थांबला. नातेवाईक शेतात दाखल होताच त्यांनी इमरान यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोबत मारलेला सापही नेला. त्यामुळे डॉक्टरांना उपचार करणे सोपे झाले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर शेख इमरान यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.