वाशिम : राज्यातील २८ लाख माती नमुन्यांची तपासणी करुन सन २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षात १.३० कोटी शेतकऱ्यांना ‘सॉईल हेल्थ कार्ड’ वितरित करण्यात आले आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ६० हजारावर शेतकºयांचा समावेश आहे. सन २०१९-२० या वर्षात ‘सॉईल हेल्थ कार्ड’ प्रक्रियेत बदल केला असून, प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड केली जाणार आहे.जमिनीचे आरोग्य अबाधित राखतानाच एकात्मिक अन्नघटक व्यवस्थापनासाठी तसेच खतांच्या संतुलित वापराकरीता राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सन २०१५-१६ पासून माती आरोग्य पत्रिका योजना राबविली जात आहे. राज्यात सध्या माती परीक्षणासाठी शासकीय ३१ तर योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या नोंदणीकृत अशासकीय २२४ अशा एकूण २५५ माती चाचणी प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळेत जमिनीच्या प्रमुख व सूक्ष्म अन्नघटकांसाठी माती परीक्षण केले जाते. त्याचे विश्लेषण करुन शेतकºयांना ‘सॉईल हेल्थ कार्ड’ (माती आरोग्य पत्रिका) वाटप केले जाते. सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या व वर्षात राज्यात २८ लाख माती नमून्यांची तपासणी करुन १ कोटी ३० लाख ५३ हजार शेतकºयांना माती आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ६० हजारावर शेतकºयांचा समावेश आहे.केंद्र शासनाच्या सूचनेनूसार या वर्षापासून माती आरोग्य पत्रिका योजनेत बदल करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड करुन त्यातील सर्व खातेदार शेतकºयांच्या शेतजमिनीतील माती नमुन्यांची तपासणी करुन माती आरोग्य पत्रिका वितरीत करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या पथदर्शी प्रकल्पात राज्यातील सर्व ३५१ तालुके निवडण्यात आले आहेत. त्यातील ३५१ गावांमध्ये १ लाख ८४ हजार खातेदारांचे २ लाख ८ हजार माती नमुने तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. वाशिम जिल्ह्यातही माती नमुने तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
राज्यातील १.३० कोटी शेतकऱ्यांना मिळाले ‘सॉईल हेल्थ कार्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 3:48 PM