लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाबाधितांवर वेळीच उपचार मिळावे याकरिता जिल्ह्यात १९ सरकारी कोविड हाॅस्पिटलची सुविधा उपलब्ध असून, येथे कार्यरत १३८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी कंत्राटी आरोग्य कर्मचारी संघटनेने शासनाकडे केली.कोरोना तसेच संदिग्ध रुग्णांवर वेळीच आवश्यक ते उपचार मिळावे याकरिता जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय यासह १६ सरकारी कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू नये म्हणून कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, डाटा एन्ट्री आपरेटर यांसह अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यात १३८ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांना तीन, तीन महिने कालावधीचे कंत्राटी नियुक्ती आदेश देण्यात येतात. कोरोनाकाळात चांगली सेवा दिल्याने नोकरीत सामावून घेण्याची मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली.
कोविड केअर सेंटरमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली. नियुक्ती झाल्यापासून प्रामाणिकपणे सेवा देण्यात येत आहे. कोरोनाकाळातील सेवा लक्षात घेता शासनाने नोकरीत सामावून घेतले, तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
- श्वेता गोरे, कंत्राटी कर्मचारी