वाशिम : जिल्ह्यातील १३८ कुपोषित बालकांवर योग्य उपचार मिळावे, संतुलित पोषण आहार मिळावा याकरिता एकूण ८३ ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्याबरोबरच कुपोषित बालकांवर योग्य उपचार मिळावे, संतुलित पोषण आहार मिळावा, याकरिता ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी यापूर्वी बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिकांचा आढावा घेतला होता.कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार देणे आणि वेळीच आवश्यक आरोग्य सेवा पुरविणे या दोन्ही महत्त्वाच्या बाबी आहेत. किंबहुना पूरक पोषण आणि आरोग्य सेवा या दोन्ही सेवा एकत्रितपणे आणि समन्वयाने पुरविल्या तरच हा प्रश्न सोडविता येईल. त्या अनुषंगाने अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करुन कुपोषित बालकांवर योेग्य उपचार करण्याची ही योजना शासनस्तरावरूनच समोर आली.आठवड्यातून एकदा एएनएम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ग्राम बालविकास केंद्राला भेट देऊन सर्व बालकांची तपासणी, चाचणी करतात. ज्या बालकांमध्ये वाढ किंवा सुधारणा दिसून येणार नाहीत, त्यांच्या बाबतीत पुढील वैद्यकीय उपचार केले जातात. अंगणवाडी सेविकांनी बालकांची दरमहा वजन आणि उंची घेऊन बालकांची वर्गवारी साधारण, कुपोषित आणि अति कुपोषित अशी केली जाते. बालकास ग्राम बालविकास केंद्रात दाखल केल्यानंतर सकाळी तसेच सायंकाळच्या वेळेत उपचार केले जातात. संबंधित बालकांना व त्यांच्या पालकांना पुढील ३० दिवस सलगपणे अंगणवाडीत बोलाविले जाते.वाशिम तालुक्यात १७० अंगणवाडी केंद्र असून, २९ कुपोषित बालके आढळून आली आहेत. या बालकांवर योग्य उपचार होण्यासाठी १९ ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. याप्रमाणेच रिसोड तालुक्यात १८६ अंगणवाडी केंद्र असून, १३ कुपोषित बालके आहेत. येथे ९ ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले. मालेगाव तालुक्यात १८० अंगणवाडी केंद्र असून, ३८ कुपोषित बालकांच्या उपचारासाठी १७ ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली. मंगरूळपीर तालुक्यात १८७ अंगणवाडी केंद्र असून, १४ कुपोषित बालकांच्या देखरेखसाठी ९ ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले. कारंजा तालुक्यात १५६ अंगणवाडी केंद्र असून, ९ कुपोषित बालकांच्या उपचारासाठी ६ ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले तर मानोरा तालुक्यात १९७ अंगणवाडी केंद्र असून, ३५ कुपोषित बालकांच्या उपचारासाठी २३ ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले आहे.
१३८ कुपोषित बालकांकरीता ८३ ग्राम बालविकास केंद्रांची सुविधा !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:13 PM