लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०१८-१९ चा (एनएमएमएस) निकाल शनिवार, २ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यात वाशिम जिल्ह्यातील विविध शाळांचे १३९ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांना इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, २०१८-१९ ची परीक्षा नोव्हेंबर २०१८ या महिन्यात घेण्यात आली होती. त्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. त्यातून १३९ विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता सिद्ध केली. संबंधित विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंत प्रतीमाह एक हजार रुपये याप्रमाणे चार वर्षात ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार असून सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती ललीत भुरे यांनी दिली. कारंजातील विद्यार्थ्यांची यंदाही बाजी!वाशिम जिल्ह्यातील कारंजाला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तेथील जे.सी. चवरे, जे.डी. चवरे विद्यालय व कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘एनएमएमएस’ परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत जे.डी. चवरे आणि कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेच्या प्रत्येकी ३१ विद्यार्थी-विद्यार्थीनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या असून जे.सी. चवरे विद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांनी यात यश संपादन केले आहे.
वाशिम जिल्ह्यातील १३९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 6:24 PM