वाशिम : पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या पैनगंगा बॅरेजेस परिसरात सिंचनासाठी लागणाऱ्या विजेच्या भौतिक सुविधा उभारण्यासह १४ ठिकाणी विद्यूत उपकेंद्र उभारले जाणार आहेत. ९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर असलेल्या या कामांची निविदा प्रक्रिया महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून राबविण्यात येत असून ती सध्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांनी गुरुवारी दिली.
वाशिम जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील बॅरेजेसमुळे जिल्ह्यातील आडगाव, कोकलगाव, गणेशपूर, सोनगव्हाण, टणका, ढिल्ली, राजगाव, वरूड, जुमडा, जयपूर आणि उकळी या ११ गाव परिसरांसह जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. मात्र, बॅरेजेस परिसरात विजेची सुविधा नसल्याने उपलब्ध पाणी सिंचनासाठी वापरता येणे अशक्य झाले होते. याप्रकरणी 'लोकमत'ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून सलग पाठपुरावा केला. याशिवाय आमदार राजेंद्र पाटणी यांनीही शासन दरबारी प्रयत्न केल्याने अखेर बॅरेजेस परिसरात वीज सुविधा उभारण्यासाठी जलसंपदा विभागाने अपेक्षित ९२ कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सदर रकमेचा धनादेश ५ एप्रिल २०१८ रोजी महावितरणकडे सुपूर्द केला. वीज सुविधा उभारण्याकरिता आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्यक्ष कामे सुरू होतील अशी माहिती प्राप्त झाली.
बॅरेजेस परिसरात वीज सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून २५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यानुषंगाने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्यातील वीज सुविधांसंदर्भातील प्रत्यक्ष कामे लवकरच सुरू होतील.
- व्ही.बी. बेथारिया, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम