- धनंजय कपाले लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात कोरोना व्हायरसचा वेगाने प्रादुर्भाव होत असल्याने राज्य सरकारने तुरूंगातील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील न्यायदंडाधिकारी यांनी वैयक्तीक जातमुचलक्यावर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे (कोवीड-१९) वाशिम जिल्हा कारागृहातील चौदा कैद्यांना २८ मार्चपासून ४५ दिवसासाठी मुक्त केले आहे.कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर राज्यात कारागृहांतील गर्दी कमी करण्यासाठी राज्यभरात पॅरोल आणि जामिनावर तातडीने सुटका करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया शुक्रवारपासून वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एम. सय्यद, विधी व न्याय विभागाचे सचिव, राज्य विधी सेवा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष व कारागृह महानिरीक्षक यांनी ७ वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेले आरोपी व कच्च्या कैद्यांना पॅरोल आणि जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.या अनुषंगाने वाशिम जिल्हा कारागृहातील १४ कैद्यांना मुक्त केले आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तुरूंग अधिकारी सोमनाथ पाडुळे यांनी व्यक्त केली.सोडलेल्या कैद्यांना काही अटी व शर्तीवर पॅरोल-जामीन मंजूर करण्यात आला. पॅरोल व जामीन देण्यात येणाऱ्यांमध्ये टाडा, पॉक्सो, आर्थिक गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगणारे, मोका तसेच देशविघातक कृत्य करणाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही असे तुरूंग अधिकाºयांनी स्पष्ट केले.
वाशिम कारागृहातील १४ कैद्यांची पॅरोलवर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:47 AM