तळप बु. (जि. वाशिम): मानोरा येथील महावितरण कार्यालयाने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयक आकारून आर्थिक लूट चालविली असून, तालुक्यातील तळप बु. येथील एका दारिद्रय़रेषेखालील ग्राहकाला दोन महिन्यांसाठी तब्बल १४ हजार ८१0 रुपये आकारण्याचा प्रताप या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. मानोरा तालुक्यातील वीज ग्राहक आधीच महावितरणकडून होत असलेल्या त्रासामुळे वैतागले आहेत. अनियमित वीजपुरवठा, वारेमाप देयके आणि तक्रारींच्या निवारणात होत असलेली दिरंगाई हे प्रकार सुरू असतानाच अवाजवी देयकाचा आणखी धक्कादायक प्रकार तळप बु. येथे पाहायला मिळाला आहे. तळप बु. येथील वीज ग्राहक रमेश नामदेव अंबुरे यांना महावितरण कार्यालयाने दोन महिन्यांसाठी तब्बल १४ हजार ८१0 रुपये देयक आकारले आहे. सदर व्यक्ती दारिद्रय़रेषेखालील असून, त्यांना राजीव गांधी विद्युतीकरण योजनेंतर्गत वीजपुरवठा देण्यात आला आहे. या योजनेतील ग्राहकांना इतर ग्राहकापेक्षा कमी देयक येणे अपेक्षित आहे; परंतु या ग्राहकाचा वीज वापरही अगदीच कमी असतानाही त्यांना दोन महिन्याच्या वीज बिलापोटी १४ हजार ८१0 रुपये देयक देण्यात आले. त्यांना आलेल्या विजदेयकातील रक्कम पाहून परिसरातील वीजग्राहक अवाक् झाले आहेत. दरम्यान, परिसरातील इतर वीज ग्राहकांनाही अशा प्रकारची वारेमाप देयके देण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अंबुरे यांनी १ जुलै रोजी संबंधित अधिकार्यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.
दारिद्रय़रेषेखालील ग्राहकाला १४ हजारांचे देयक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2015 2:09 AM