मंगरूळपीर : तालुक्यातील मुदत संपून निवडणूक पार पडलेल्या ग्रामपंचायतीसाठी ७ डिसेंबर २०२० रोजी जाहीर आरक्षणानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असलेली १४ गावे २ फेब्रुवारी रोजीच्या आरक्षण सोडतीत नामाप्र प्रवर्गासाठी राखीव झाली. त्यामुळे या प्रवर्गातील सरपंच पदासाठी इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला, तर नव्यांना संधी उपलब्ध झाली.
यापूर्वी ७ डिसेंबर रोजी जाहीर सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत मंगरूळपीर तालुक्यातील ३४ गावे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होती; परंतु २ फेब्रुवारी रोजीच्या आरक्षणात यामधील पिंपळखुटा, ईचा, कंझरा, पारवा, तपोवन, नांदखेडा, शेगी, पिंपळगाव व लाठी आदींसह १४ गावे नामाप्र प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. त्यामुळे इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला असून, काही ठिकाणी सरपंच पदात फेरबदल होणार आहेत. असे असले तरी अद्याप महिला आरक्षण जाहीर करण्यात आले नसून ४ जानेवारी रोजी याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.