महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून माझी उपजीविका समृद्धी मोहीम राबविली जात आहे. येत्या १५ जुलैपर्यंत ही मोहीम राबविली जाणार असून, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ग्रामसंघाद्वारे शेतकऱ्यांसाठी एकत्रित बियाणे, तसेच खते व औषधी खरेदी करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ३१६ ग्रामसंघांनी मिळून ६१ लाख ९३ हजार रुपये किमतीचे ५१७ क्विंटल २७ किलो बियाणे, तर ८२ लाख १७ हजार रुपये किमतीचे १ हजार ८२५ क्विंटल ९८ किलो खते खरेदी करून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविली आहेत. अवघ्या आठवडाभरातच जिल्ह्यातील ३१६ ग्रामसंघाने ही मजल मारली असून, येत्या १५ जुलैपर्यंत ही मोहीम राबविली जाणार असून, अधिकाधिक शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे या अंतर्गत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
----------
प्रत्येक गावात बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक
ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत केवळ शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणेच पोहोचविण्याचे काम केले जात नसून, बियाण्यांच्या उगवणक्षमता अभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावात समुदाय संसाधन व्यक्ती, कृषी सखीकडून शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले. यात केवळ ७० टक्क्यांपेक्षा अधिक उगवणक्षमता असलेले बियाणेचे पेरण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संभाव्य दुबार पेरणीचे संकट टळू शकले आहे.
------------------
खते, बियाण्यांचे तालुकानिहाय वितरण (क्विंटल)
तालुका - बियाणे - खते
कारंजा - १४०.०० - ४०२.००
मालेगाव - १०३.७० - ३०१.४०
मं.पीर - ५२.०० - ३०८.००
मानोरा - १२९.०० - २७४.००
रिसोड - ३६.५७ - २६१.००
वाशिम - ५६.०० -२७९.०८
---------------------------
एकूण ५१७.२७ - १८२५.९८
---------------