लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेल्या १४७ प्राथमिक शिक्षकांचे समुपदेशन पद्धतीने १७ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांवर समायोजन करण्यात आले. गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद असल्याने शिक्षकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागले. आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार झाली. शासन स्तरावर या मागणीचा सकारात्मक विचार झाल्याने आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली निघाले. या प्रक्रियेत वाशिम जिल्ह्यात एकूण २१३ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेतु तर वाशिम जिल्ह्यातील एकूण ७४ शिक्षक अन्य जिल्ह्यात बदलून गेले. २१३ पैकी १४७ शिक्षक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात १५ दिवसांपूर्वी रुजू झाले होते. या शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर पदस्थापना देण्यासाठी १७ जुलैला समुपदेशन पद्धती राबविण्यात आली. जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात दुपारी १२.३० वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, आदींच्या उपस्थितीत प्राधान्य क्रमानुसार शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली. पती, पत्नी एकत्रीकरण, दिव्यांग, सेवा ज्येष्ठता, दुर्गम भागातील सेवा आदी निकष लक्षात घेऊन समुपदेशनाने शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली. यावेळी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी गजानन खुळे, ढाकरके, अमोल कापसे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.स्थायी समितीत उपस्थित झाला होता मुद्दाशिक्षकांच्या समायोजनाचा मुद्दा १४ जुलै रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी उपस्थित केला होता. याची दखल तातडीने घेण्यात आली. त्यानुसार शिक्षकांचे समायोजन करण्यात आले.
१४७ शिक्षकांचे समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:05 AM