लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले. हे काम २०१७ मध्ये पूर्ण झाले; मात्र १२ पैकी १० विद्यूत उपकेंद्रांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. याशिवाय हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे असलेल्या १३२ के.व्ही. पॉवरहाऊस येथून विद्युत प्रवाह घेण्यासाठी लाईन टाकण्याचा प्रश्नही रखडला आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी किमान १५ कोटींचा निधी लागणार असून शासनस्तरावरून तो मिळणे अशक्य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम-हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीचे पाणी सिंचनासाठी वापरता यावे, पावसाचे पाणी नदीपात्रातून वाहून जाण्याऐवजी ते ठिकठिकाणी अडविता यावे, यासाठी ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून आडगाव, कोकलगाव, गणेशपूर, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली, राजगाव, वरूड, जुमडा, जयपूर आणि उकळी या ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले आहेत. त्यात परतीच्या पावसाचे पाणी अडविणे शक्य झाले आहे. दरम्यान, मोटारपंपाने नदीपात्रातील पाणी घेण्याकरिता विद्युतची गरज भासणार आहे. त्यासाठी १२ विद्युत उपकेंद्र उभारण्यास शासनाने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला. नोव्हेंबर २०२० अखेर त्यातील १० उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली; परंतु राजगाव आणि आटकळी येथील दोन विद्युत उपकेंद्रांसाठी व हिंगोली येथून मुख्य विद्युत प्रवाह खेचण्याकरिता लागणारा १५ कोटींचा निधी मिळाला नसल्याने ही कामे प्रलंबित आहेत. परिणामी, गणेशपूर, अटकळी, राजगाव अशा काही उपकेंद्रांची कामे रखडली असून, नदीपात्रातील पाण्याचा अपेक्षित फायदा अद्याप झालेला नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
प्रलंबित असलेल्या उपकेंद्रांची कामे पूर्ण करण्यासाठी तसेच सेनगाव (जि. हिंगोली) येथील १३२ के.व्ही. पॉवर हाऊसमधून मुख्य लाईन टाकण्याचे काम १७ किलो मिटरपर्यंत पूर्ण झाले आहे. तर १५ किलोमिटरचे काम अपूर्ण आहे. यासाठी लागणाऱ्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. निधी मंजूर होताच अन्य उपकेंद्रांप्रमाणे प्रलंबित असलेली कामेही पूर्ण केली जातील. तसेच मुख्य विद्युत वाहिणी टाकण्याचे कामही विनाविलंब पूर्ण केले जाईल.- आर.जी. तायडे, कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम.