मालेगाव : तालुक्यातील अमानवाडी येथे सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनाच्यावतीने १५ दिवसांआड पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेची विहीर कोरडी पडल्याने ही समस्या उद्भवली आहे. अमानवाडी हे दोन हजार लोकवस्तीचे गाव असून, गावात पाणीपुरवठ्याची एकमात्र विहीर आहे. त्या विहिरीला थेंबभरही पाणी शिल्लक नाही. याशिवाय गावातील दोन्ही हातपंपही नादुरूस्त आहेत. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत आडवे बोअर घेतले; परंतु त्याला थोडेथोडकेच पाणी लागले. त्यामुळे प्रश्न निकाली निघाला नाही. गावातील सार्वजनिक विहिरीत निर्मलाबाई पांडे यांच्या अधिग्रहित केलेल्या विहिरीवरून पाणी सोडले जाते. त्यासाठी शिवाजी गीते यांच्या पाइपलाइनचा उपयोग करण्यात आला आहे. गावातील महिला त्या विहिरीवरून पाणी भरतात. काही ग्रामस्थ अमाना रेल्वे स्टेशननजिक असलेल्या कूपनलिकेवरून पाणी भरत असल्याचे दिसून येत आहे. म्हणायला, गावात पाणीपुरवठा योजनेचे दोन जलकुंभ आहेत. मात्र, त्यापैकी एकाची दुरुस्ती करण्याची गरज उद्भवली आहे.दरवर्षीच्याच उन्हाळ्यात अमानवाडी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण होते. यंदाही गावातील पाणी प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन यावर प्रभावी तोडगा काढून गावकऱ्यांची सोय करणे आवश्यक आहे. - गजानन गणोदे, अमानवाडीअमानवाडी गावात उद्भवलेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीनजिक जलसंधारणाची कामे होणे आवश्यक आहे. असे झाल्यास जमिनीखालची पाणी पातळी वाढून गावाला पाणी मिळणे शक्य आहे. यायोगे पाणीप्रश्न निकाली निघणे शक्य असून, प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे.- नंदकिशोर जयस्वाल, सरपंच, अमानवाडी
१५ दिवसांआड मिळतेय पिण्याचे पाणी!
By admin | Published: May 04, 2017 1:20 AM