मालेगाव : मालेगाव तालुक्यातील १५ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, १३ ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले तर ३ गावात टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी एका गावात टँकर सुरू झाले आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी ब-यापैकी पाऊस झाल्याने तसेच त्यानंतरही परतीच्या पावसामुळे प्रकल्पात ब-यापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तीव्रतादेखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी १५ पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचली होती. जवळपास १२ ठिकाणी विहीर अधिग्रहण केले होते तर पाच ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिस-या आठवड्यातही तालुक्यातील ग्रामपंचायतीचा टँकरसाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला नाही. आता तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील पांगरी कुटे, शेलगाव बोदाडे, ब्राह्मणवाडा खुर्द, मानका, कोलही, वारंगी, बोर्डी, जऊळका, वरदरी बुद्रुक, वरदरी खुर्द, राजुरा, गिव्हा कुटे, भेरा, खैरखेडा, पिंपळवाडी या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय काही गावात शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावक-यांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतु, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे टँकर, नळ दुरुस्ती, विहीर अधिग्रहण आदीबाबत फारसे प्रस्ताव नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
०००
बॉक्स
बारा ठिकाणी विहीर अधिग्रहण
तालुक्यातील १२ गावात विहीर अधिग्रहणाचे आदेश झाले असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे गावक-यांना तूर्तास दिलासा मिळत असल्याचे दिसून येते.
०००
कोट बॉक्स
आमच्याकडे जे प्रस्ताव आले, ते मंजुरीकरिता पाठविण्यात आले आहेत. अजून जे प्रस्ताव प्राप्त होतील, ते पाठवून पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल.
श्रीनिवास पदमनवार
गटविकास अधिकारी, पं. स. मालेगाव