वाशिम - जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पेरणीच्या पद्धतीत बदल केले आहेत. त्याचे चांगले परिणाम आता दिसत असून, चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पेरलेल्या सोयाबीन पिकातील प्रत्येक झाडाला सरासरी १४० ते १५० शेंगा लागल्या आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांना सोयाबीनचे भरघोस उत्पादन होणार असल्याचे दिसून येते.
मागील काही वर्षांपासून वाशिम जिल्हा सोयाबीन बेल्ट म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात सोयाबीनचीच पेरणी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेच मुख्य पीक बनले आहे. या पिकाच्या शेंगा आता परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. यंदाच्या हंगामात पेरणीच्या पद्धतीत शेतकऱ्यांनी बदल केला. काहींनी सरीवरंबा पद्धती, काहींनी पट्टा पद्धतीचा अवलंब केला. यासाठी टोकण यंत्र आणि बीबीएफ यंत्राचा आधार घेतला. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ झाली आहे. चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी बचत गटातील २५ शेतकऱ्यांनी पट्टा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाच्या झाडांना सरासरी १४० ते १५० शेंगा लागल्या आहेत.
३० एकरात सरसकट एकच वाण
चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी गटाने पारपंरिक पद्धती डावलून यंदा पट्टा पद्धतीने पेरणी करण्यासाठी सरसकट एकाच वाणाचा वापर केला. या शेतकऱ्यांंनी ३० एकर क्षेत्रात सोयाबीनचे जेएस ९३०५ हे वाण वापरले. अधिक उत्पादनासाठी हे वाण ओळखले जातेच शिवाय या वाणावर किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव थोडा कमी आढळतो.
यंदाच्या हंगामात आम्ही पाणी फाऊंडेशनकडून आयोजित सोयाबीन शेतीशाळेतील मार्गदर्शनाच्या आधारे एक गट एक वाण, तसेच पट्टा पेरणी पद्धतीचा अवलंब करून जेएस ९३०५ हे वाण वापरले. याचा फायदा झाला. एका झाडाला सरासरी १४० ते १५० पेक्षा अधिक शेंगा लागल्या आहेत.
- श्याम भगत, सदस्य , अर्णवी शेतकरी गट, चिंचाळा (मंगरुळपीर)