सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे ओडीओपी उत्पादनांवर आधारित वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, तसेच शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसाहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रँडिंग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित अशा पुरवठा साखळीशी जोडणे, महाराष्ट्रातील २१९९८ सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी साहाय्य करणे, सामाईक सेवा जसे की सामाईक प्रक्रिया सुविधा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन, तसेच उद्योगवाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे, अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक साहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे, हा या योजनेचा उद्देश असून, यासाठी प्रकल्प अहवाल बनविणे, ऑनलाइन अर्ज करणे, बँकांकडे पाठपुरावा करणे, विविध परवाने काढणे इत्यादीसाठी संसाधन व्यक्तींकडून विनामूल्य मदत केली जाणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी १५५ उद्योगांचे उद्दिष्ट कृषी विभागाने निर्धारित केले आहे.
---------
पात्र लाभार्थींचे गट
सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेसाठी पात्र लाभार्थींमध्ये वैयक्तिक लाभार्थींच्या अ गटात वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतिशील शेतकरी, मर्यादित भागीदारी संस्था, भागीदारी संस्था, तर गट लाभार्थींच्या ब गटात शेतकरी गट, कंपनी, संस्था, स्वयंसाहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था पात्र राहणार आहेत.
----------
१० लाखांपर्यंत अनुदान
या योजनेत वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के व अधिकाधिक १० लाख रुपयांच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. त्याकरिता डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. पीएमएफएमई.एमओएफपीआय.गव्ह.इन किंवा संकेतस्थळ पीएमएफएमई एमआयएस पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत.
---------------
तालुका व प्रवर्गनिहाय उद्दिष्ट
तालुका - जनरल - एससी - एसटी - एकूण
वाशिम - २२ - ०४ - ०० - २६
मालेगाव - २२ - ०३ - ०१ - २६
रिसोड - २२ - ०३ - ०१ - २६
मं.पीर - २१ - ०४ - ०१ - २६
मानोरा - २१ - ०४ - ०० -२५
कारंजा - २२ - ०४ - ०० -२६
----------------------------------