शिरपूर जैन: खरीप हंगामासाठी पिक कर्ज वाटपात शिरपूर परिसरात जिल्हा मध्यवर्ती बँक अग्रेसर ठरली असून ५ मे पर्यंत १९५० सभासदांना १५ कोटी ५९ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
राष्ट्रीयकृत बँका मध्यवर्ती बँकेच्या तुलनेत कर्ज वाटपामध्ये फार मागे आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप प्रक्रिया विविध बँकामार्फत एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आली आहे. शिरपूर परिसरात सेवा सोसायटी मार्फत जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा शिरपूर तर राष्ट्रीयकृत बँकेच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र व विदर्भ क्षेत्रीय कोंकण बँकेच्या वतीने कर्ज वाटप करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून २१ सेवा सोसायटीच्या १९५० सभासदांना १५ कोटी ५९ लाख रुपये इतके पीक कर्ज ५ मे पर्यंत वितरण करण्यात आले. राष्ट्रीयकृत बँकेचे वतीने बँक ऑफ महाराष्ट्र २०१ शेतकऱ्यांना १ कोटी ७५ लाख पीक कर्ज वितरण करण्यात आले. तर विदर्भ क्षेत्रीय कोंकण बँकेच्या वतीने २०० शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख रुपये इतके पीक कर्ज वितरण करण्यात आले आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक ही राष्ट्रीय बँकेच्या तुलनेत फार पुढे असल्याचे दिसत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकेची कर्ज वितरण प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक गतीने होत आहे, हे ही तेवढेच खरे आहे.