राष्ट्रीयीकृत बँका मध्यवर्ती बँकेच्या तुलनेत कर्ज वाटपामध्ये फार मागे आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप प्रक्रिया विविध बँकांमार्फत एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आली आहे. शिरपूर परिसरात सेवा सोसायटीमार्फत जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा शिरपूर तर राष्ट्रीयीकृत बँकेच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र व विदर्भ क्षेत्रीय कोंकण बँकेच्या वतीने कर्ज वाटप करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून २१ सेवा सोसायटीच्या १९५० सभासदांना १५ कोटी ५९ लाख रुपये इतके पीककर्ज ५ मेपर्यंत वितरण करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकेच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्रकडून २०१ शेतकऱ्यांना १ कोटी ७५ लाख पीककर्ज वितरण करण्यात आले, तर विदर्भ क्षेत्रीय कोंकण बँकेच्या वतीने २०० शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख रुपये इतके पीककर्ज वितरण करण्यात आले आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या प्रक्रियेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक ही राष्ट्रीयीकृत बँकेच्या तुलनेत फार पुढे असल्याचे दिसत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकेची कर्ज वितरण प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक गतीने होत आहे, हेही तेवढेच खरे आहे.
१९५० सभासदांना १५.५९ कोटी पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:43 AM