वाशिम : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (ग्रामीण) सन २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यातील २०३३ पैकी ४७३ लाभार्थिंना अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला असून, उर्वरित १५६० लाभार्थिंना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र लाभार्थिंना घरकुलाचा लाभ देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) राबविण्यात येते. घरकुल बांधकामासाठी लाभार्थिंना तीन हप्त्यांमध्ये १.२० लाख रुपये दिले जातात. सन २०१९-२० या वर्षात जिल्हयात १४०७ तर सन २०२०-२१ या वर्षात जिल्हयात २०३३ घरकुलांना मंजुरी मिळाली. २०१९-२० मध्ये १३२३ लाभार्थिंना अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला तर ८४ जणांना पहिला हप्ताही मिळाला नाही. २०२०-२१ मध्ये ४७३ लाभार्थिंना पहिला हप्ता मिळाला तर १५६० जणांना पहिला हप्ता मिळाला नाही. अनेकांना पहिला हप्ता दिल्यानंतर पुढचे पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे पडके घर तोडून पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आहे. पुढील हप्त्याचे पैसे मिळाले नसल्याने घराचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या लाभार्थिंना गैरसोयींना सामाेरे जावे लागत आहे.
घरकुल योजनेंतर्गत अनुदानाचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. उसनवारी करून घरकुलाचे बांधकाम केले. अनुदानाचे उर्वरित हप्ते मिळाले तर घरकुलाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करता येईल. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे.-राजेंद्र वानखडे,घरकुल लाभार्थी.
शासनाच्या विविध योजनांतून पात्र लाभार्थिंना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. ही बाब अतिशय चांगली आहे. परंतु, अनुदान वेळेवर व नियमित मिळत नसल्याने लाभार्थिंना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंचायत समिती कार्यालयात चकरा मारूनही लवकर न्याय मिळत नाही. अनुदान लवकर मिळाले तर घरकुलाचे बांधकामही वेळेवर होऊ शकते.- सीताराम पवार,घरकुल लाभार्थी.