वाशिम : अकोला परिमंडळातील विविध गावांमध्ये सुरू असलेला वीज चोरीचा प्रकार हाणून पाडण्यासाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील १६४ ठिकाणचे आकडे हटविण्यात आले असून अकस्मात वाढलेले रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होवून रोहित्रांवरील ११६० हाॅर्स पाॅवरचा अतिरिक्त भार कमी झाला, अशी माहिती महावितरणचे पीआरओ फुलसिंग राठोड यांनी १० सप्टेंबर रोजी दिली.
अधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना सलग ८ तास वीज पुरवठा देण्याचा प्रयत्न महावितरणकडून केला जात आहे. मात्र, अवैध वीज जोडणीचा वापर वाढल्याने रोहीत्रे अतिभारीत होऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. काही ठिकाणी याच कारणांमुळे रोहीत्र जळण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी, महावितरणला शेतकऱ्यांच्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, अनधिकृत वीज वापरामुळे महावितरणवर ताण वाढत असल्याने महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी वीज वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहिम हाती घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ६ सप्टेंबरपासून मोहिम सुरू करण्यात आली. याअंतर्गत जिल्ह्यातील १६७ हूक बहाद्दरांवर कारवाई करून आकडे तत्काळ प्रभावाने हटविण्यात आले आहेत.रोहित्र जळण्याचे प्रमाण झाले कमी
जिल्ह्यात विविध १६७ ठिकाणी वीज वाहिन्यांवर टाकण्यात आलेले अनधिकृत आकडे हटविण्यात आल्याने रोहित्रांवरील ११६० हॉर्स पॉवरचा अतिभार कमी झाला. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन वीज रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.‘त्या’प्रकरणी दाखल होणार ‘एफआयआर’
महावितरणला अंधारात ठेवून मंगरूळपीर तालुक्यात ९ ठिकाणी गावठाण वीज वाहिनीवरून परस्पर कृषी वाहिनीला वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे महावितरणच्या चमुच्या निदर्शनास आले. हा प्रकार शेतकऱ्यांसोबतच महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील अत्यंत धोक्याचे आहे. हे कृत्य कायदेशीर गुन्हा असल्याने महावितरणकडून याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे पीआरओ फुलसिंग राठोड यांनी सांगितले.