दादाराव गायकवाड - वाशिमपाणी फाउंडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत महाराष्ट्रदिनी १ मे रोजी ‘चला गावी’ या उपक्रमात सहभागी व्हा, गावात येऊन श्रमदानात आपले योगदान नोंदवा, आपला आवडता महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी शहर आणि गाव एकत्र मिळून काम करू या’ असे आवाहन अभिनेता अमिर खानने केले. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद लाभला असून, रविवारपर्यंत १७ हजार १८५ लोकांनी श्रमदानासाठी आॅनलाइन नोंदणी केली. कारंजा शहरातील २९७ पेक्षा जास्त नागरिकांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. कारंजा शहरातील नागरिकांचे श्रमदान जयपूर येथे होणार आहे. १ मे महाराष्ट्रदिनी जलसंधारणाच्या कामात श्रमदान करण्याच्या उद्देशाने शहरी भागातील नागरिकांची आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी राज्यातील १३ तालुक्यात सुविधा करण्यात आली. यामध्ये विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, अकोला जिल्ह्यातील अकोट, अमरावती जिल्ह्यातील वरूड, वर्धा जिल्हयातील आर्वी, तसेच राज्याच्या इतर भागातून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि आटपाटी, अंबाजोगाई जिल्ह्यातील केज, लातूर जिल्ह्यातील औसा, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, तसेच सोलापूर जिल्ह्यातील एका या तालुक्याची १ मे रोजीच्या ‘चला गावी’ अभियानासाठी निवड करण्यात आली. यासाठी सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून नागरी भागातील जनतेला जलसंधारणाच्या कामांत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आणि आपला सहभाग नोंदविण्यासाठी एक यूआरएल लिंक जाहीर करून त्याद्वारे पाणी फाउंडेशनशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली. याला राज्यातील जनतेकडून प्रचंड प्रतिसाद लाभला. या अभियानांतर्गत गावात श्रमदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे स्वागत गावकरी करणार आहेत. शहर आणि महानगरातील लोकांना दुष्काळाविरुद्धच्या लढ्यात समाविष्ट करून घेण्यासाठीचा आणि श्रमदानाच्या माध्यमातून शहर आणि गावातील लोकांमध्ये संवाद साधून आणण्याचा हा प्रयत्न आहे. आॅनलाइन श्रमदानासाठी पाणी फाउंडेशन मुंबई कार्यालयात नोंदणी केल्यामध्ये श्रमदानासाठी महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती जयपूर येथे येणार, पण तो कोण प्रतिष्ठीत आहे, की उघोगपती आहे की सिनेकलाकार आहे किंवा वर्ग १ चे अधिकारी आहेत हे गावकऱ्यांना माहित नसणार आहे. ते १ मे रोजी सकाळी ६ वाजता गावात येऊन ९ वाजेपर्र्यंत गावकऱ्यांनी नेमून दिलेल्या कामांत श्रमदान करणार आहेत. शहरी व ग्रामीण भागातील जनतेत सुसंवाद होऊन जलसंधारणाची कामे सोपी व्हावी, यासाठी महाराष्ट्र दिनी नागरी भागातील लोकांना ‘चला गावी’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यातील १३ तालुक्यांत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. - लॅन्सी फर्नांडिज, प्रशिक्षण प्रमुख, पाणी फाउंडेशन
महाराष्ट्रदिनी १७ हजार नागरिक करणार श्रमदान
By admin | Published: May 01, 2017 2:13 AM