हराळ (जि. वाशिम), दि १४ : नित्यनेमाप्रमाणे शेतशिवारात पीक पाहणी करण्यासाठी गेलेल्या हराळ येथील १७ वर्षीय विद्यार्थ्याचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, हराळ येथील संतोष मदन सरकटे नामक मुलगा १३ ऑगस्टला सायंकाळी नेहमीप्रमाणे शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे गावकरी व कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता, रविवारी सकाळी शादिक घनकर यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची वार्ता गावात वार्यासारखी पसरली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली. दरम्यान, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरकटे, पोलीस पाटील अतिवीर जोगी, राजू ज्ञानबा सरकटे, नागेश रामभाऊ सरकटे, राजू धनगर यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस निरीक्षक व्ही.पी.खुळे, हेंबाडे यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला. मृतक मुलगा हा इयत्ता १२ वीला शिकत होता. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी असल्याची माहिती आहे.
१७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू!
By admin | Published: August 15, 2016 2:26 AM