लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत माहुली हे गाव हगणदरीमुक्त करण्याच्या उद्देशाने कठोर पावले उचलत ग्रामसेवक एकनाथ चिकटे यांनी १६ मे रोजी १८ नागरिकांना उघड्यावर शौचास गेल्याप्रकरणी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.गेल्या दोन दिवसांपासून ग्रामसेवकांनी आपल्या पथकासमवेत उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरूद्ध दंड ठोठावण्याची कारवाई अवलंबिली आहे. १६ मे रोजी तपासणी मोहिमेदरम्यान १८ नागरिकांकडून प्रत्येकी १२० रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला. तसेच उघड्यावर शौचास न जाता घरात बांधकाम करण्यात आलेल्या शौचालयाचा वापर करण्याची तंबी त्यांना देण्यात आली. शौचालयांचा वापर जाणीवपूर्वक टाळल्यास शासनाकडून मिळणाऱ्या योजना व इतर अनुदानही बंद केले जाईल, असा इशाराही संबंधिताना देण्यात आला. यावेळी माहुलीच्या सरपंच निशा राम राठोड, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांच्यासह इतर सदस्य व नागरिकांची उपस्थिती होती.
उघड्यावर शौचास जाणाऱ्या १८ नागरिकांना ठोठावला दंड!
By admin | Published: May 17, 2017 1:43 AM