लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विदर्भ व मराठवाड्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील तसेच उर्वरीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण जिल्ह्यातील बांधकामाधीन ९१ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या विशेष पॅकेजच्या योजनेस ‘बळीराजा जलसंजीवणी योजना’ असे संबोधण्यास राज्याच्या जलसंपदा विभागाने १ जानेवारी २०१९ रोजी मान्यता दिली आहे. बळीराजा जलसंजीवणी योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील एकूण १८ प्रकल्पांचा समावेश असून, सदर प्रकल्प सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.विदर्भ व मराठवाड्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील तसेच उर्वरीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण जिल्ह्यातील बांधकामाधीन ९१ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष पॅकेजच्या स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार राज्यातील बांधकामाधीन ९१ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने विशेष पॅकेज दिले आहे. या विशेष पॅकेजच्या योजनेस आता ‘बळीराजा जलसंजीवणी योजना’ असे संबोधण्यात येणार आहे. बळीराजा जलसंजीवणी योजनेत विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ८३ लघु पाटबंधारे प्रकल्प, ३ मोठे व मध्यम तसेच अवर्षणप्रवण जिल्ह्यातील ५ मोठे व मध्यम प्रकल्प अशा एकूण ९१ प्रकल्पांचा समावेश आहे. सदर प्रकल्प सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पांसाठी लागणाºया खर्चाची विभागणीही केली असून, त्याअनुसार केंद्र हिस्सा २५ टक्के आणि राज्य शासन हिस्सा ७५ टक्के राहणार आहे. या प्रकल्पांमध्ये वाशिम जिल्ह्यातील फाळेगाव संग्राहक, इंगलवाडी संग्राहक, जयपूर, अरक चिंचाळा, मंगळसा संग्राहक तलाव, मिर्झापूर, पळसखेड, पंचाळा संग्राहक तलाव, पांग्राबंदी बृहत लघु पाटबंधारे, रापेरी संग्राहक तलाव, शेलगाव संग्राहक, सुरकंडी संग्राहक, स्वासीन, उमरी, गोंडेगाव, वाडी रायताळ, वाकद संग्राहक तलाव आणि वारा जहाँगीर या प्रकल्पांचा समावेश आहे.
बळीराजा जलसंजीवनी योजनेत वाशिम जिल्ह्यातील १८ प्रकल्पांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 1:29 PM