वाशिम हे तालुक्याचे, तसेच जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्यामुळे वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागांसह जिल्हाभरातील ग्रामीण भागांतून विविध कामांसाठी दरदिवशी हजारो लोक वाशिम येथे येतात. या लोकांचा परस्परांशी संपर्क होऊन कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत आहे. तालुक्यातील जवळपास प्रत्येकच गावांत कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे. वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना चाचणीवर आरोग्य विभाग भर देत असून, आवश्यक तेथे ग्रामस्थांची आरटीपीसीआर, रॅपिड अॅन्टीजन टेस्ट केली जात आहे. चाचणीचे नमुने जिल्हास्तरावर तपासणीसाठी पाठविल्यानंतर अहवाल प्राप्त होताच पुन्हा संबंधित भागांत कोरोना चाचणी केली जात आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रांसह आता लहानसहान गावांतही कोरोना संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांना तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, तसेच हात वारवांर सॅनिटायझर किंवा साबणाने धुण्यासह लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे.
-------------
दिवसाला सरासरी २७ जणांना संसर्ग
वाशिम तालुक्यात दरदिवशी कमी अधिक प्रमाणात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत असून, २७ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यानच्या आठ दिवसांत तालुक्यातील १८८ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. अर्थात दिवसाला वाशिम तालुक्यात २७ जणांना कोरोना संसर्ग होत असल्याचे दिसत असून, पुढे हे प्रमाण वाढण्याची भिती असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करून खबरदारी घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.
----------------
अशी आहे आठवड्यातील रुग्ण संख्या
तारीख कोरोना बाधित
४ मार्च २५
३ मार्च २५
२ मार्च १९
१ मार्च ३१
२८ फेब्रु ४२
२७ फे ब्रु २३
२६ फेब्रु २३