वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयात २९ मे रोजी समुपदेशन पद्धतीने ५७ महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यापैकी १९ कर्मचारी प्रशासकीय बदलीने जिल्हाधिकारी कार्यालयात आले. सोमवारी, ५ जून रोजी या १९ कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखा, टेबलवर पदस्थापना देण्यात आली.
२९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांनी समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविली होती. जवळपास ५७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये अव्वल कारकून, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, मंडळ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. १९ महसूल कर्मचाऱ्यांची बदली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. यामध्ये पाच अव्वल कारकून तर १४ महसूल सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या कर्मचाऱ्यांना आता जिल्हाधिकारी कार्यालयातील शेतकरी आत्महत्या शाखा, गौण खनिज शाखा, महसूल, जि.प. निवडणूक, ग्रा.पं. निवडणूक, नैसर्गिक आपत्ती, जमाबंदी, आस्थापना, आवक-जावक, रोहयो, भूसंपादन यांसह विविध शाखेत पदस्थापना देण्यात आली.
एकतर्फी कार्यमुक्त..
जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांत पदस्थापना देण्यात आलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना यापूर्वीच्या ठिकाणावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अव्वल कारकून व महसूल सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रूजू व्हावे, असे निर्देशही देण्यात आले.